जेएनएन, मुंबई: विनायक चतुर्थी हा सण गणेशाला समर्पित असून, प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी साजरी केली जाते. भगवान श्री गणेशावर आस्था ठेवणारे त्यांचे भक्त दर महिन्याला विनायक चतुर्थीचा उपवास करतात. विनायक चतुर्थी हा 'गणेशोत्सव' म्हणून ही जगभर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. विनायक चतुर्थी भारतात सर्वत्र साजरी केली जात असून, महाराष्ट्रात या सणाला सर्वात जास्त मान्यता आहे.

मे महिन्यातील चतुर्थी 

या महिन्यातील विनायक चतुर्थी ही 11 मे शनिवारी येत आहे. मराठी महिन्यानुसार ही चतुर्थी वैशाख महिन्यात येत आहे. तसेच याच महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही 26 मे ला रविवारी येत आहे. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय 9.41 मिनिटांनी होणार आहे. 

चतुर्थी

हिंदू कॅलेंडरमध्ये प्रत्येक चंद्र महिन्यात दोन चतुर्थी असतात. हिंदू धर्मग्रंथानुसार चतुर्थी ही गणेशाची तिथी आहे. अमावास्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात पाळले जात असले तरी मुख्य विनायक चतुर्थी व्रत भाद्रपद महिन्यात साजरी केली जाते.

संकष्टी चतुर्थी

    हिंदू धर्मात चतुर्थीला सर्वाधिक महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. एका वर्षात 12 संकष्टी चतुर्थी येतात आणि अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. श्री गणेशाचे भक्त मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. प्रत्येक गणेश मंदिरात चतुर्थी साजरी केली जाते. श्री गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे.  हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक चंद्र महिन्यात कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी येते. (अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवडा). हीच  चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.