जेएनएन, मुंबई: हवामान विभागाच्या वतीने राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे. असे असताना नागपूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा देखील 42 अंशावर पोहोचला आहे. जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थामधे उष्माघात कक्ष सुरु केले आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारची तयारी करण्यात आली असून, उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी देखील आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांसाठी उपाययोजना जारी करण्यात आल्या आहे.

उष्माघात होण्याची कारणे:
शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घटट कपडयाचा वापर करणे, प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थीतीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

उष्माघाताची लक्षणेः
मळमळ, उलटी, हात पायांना गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सीअस पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे, व कोरडी पडणे, क्वचीत लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुस्ताही वाटणे, डोके दुखणे, छातीत घडघड होणे, बेशुध्दआवस्था आदी अति जोखमीच्या व्यक्ती, बालके, लहान मुले, खेळाडु, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हयदय रोग, फुफुसाचे विकार, मुत्रपिंडाचे विकार इत्यादी. 

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

  • वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची काम करणे टाळणे, कष्टाची काम सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करण्याचे नियोजन करावे. 
  • उष्णता शोषुण घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल पांढरे कपडे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. तीव्र उष्णाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे.
  • प्रवासाला जातांना पाणी सोबत घ्यावे, डिहायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबु सरबत लस्सी ताक, नारळ पाणी आदी प्यावे. उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, रुमाल, फेटा, छत्री, आदीचा वापर करावा.
  • घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स एअर कंडीशनर्स, वाळयाचे पडदे आवश्यकतेनुसार वापर करावा.

उष्माघाताच्या रुग्णांची अशी घ्या काळजी:

    • रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरु करावेत, कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत.
    • रुग्ण शुध्दीवर आल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी दयावे व डिहायड्रेशन टाळावे. चहा, कॉफी देऊ नये. काखेखाली आइस पॅक ठेवावे, रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात. शरीराचे तापमान 36.8 होईपर्यत सदरील प्रथमोपचार सुरु ठेवावेत.