जेएनएन, मुंबई. Lok Sabha Election 2024 Phase 2: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरवात होत आहे. दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये 8 मतदार संघात निवडणूक घेतली जाणार आहे. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदार संघ सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटवण्याकरिता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे.

ग्राह्य धरली जातील ही ओळखपत्रे 

या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे. या ओळख पत्रांच्या आधारे मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

तपासून घ्या या गोष्टी 

मतदानाला जाण्यापूर्वी मतदारांनी आपल्या मतदान पत्रावरून मतदान केंद्र तसेच मतदान केंद्रावरील आपला खोली क्रमांक तसेच आपला अनुक्रमांक तपासून घ्यावा. जेणेकरून तुम्हाला मतदान करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. वृद्ध, दिव्यांग यांना मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी. तुम्हाला असलेल्या सुविधांचा तसेच तुमच्या अधिकारांचा कोणीही गैरफायदा घेऊ नये याची दक्षता प्रत्येक मतदाराने घ्यायला पाहिजे. 

मतदान करायला जातांना उन्हापासून बचावासाठी करा हे उपाय 

    • मतदानासाठी जाताना दुपारच्या वेळी जाणे टाळावे. 
    • मतदानाला जाताना सोबत पाण्याची बाटली, तसेच स्कार्फ किंवा कॅप घेऊन जावे. 
    • उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सुती कपडे परिधान करून जाणे उत्तम.
    • उन्हात जाण्यापूर्वी थंड पेय म्हणजेच कैरीचे पन्ह, उसाचा रस, लिंबू शरबत, लस्सी प्यावी.