जेएनएन, मुंबई. Holiday Planning: सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकजण कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचे नियोजन करतात. नाताळ सण आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पर्यटनस्थळांना भेटी देतात. ट्रिपचे योग्य नियोजन करूनही अनेकांना या सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटनस्थळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अनेकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. कित्येकदा हॉटेलमध्ये बुकिंग मिळत नाही. ज्यामुळे तुम्हाला मनाप्रमाणे एन्जॉय करता येत नाही. या सर्व अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सुट्ट्यांच्या काळात जवळच्या काही निसर्गरम्य ऑफबीट ठिकाणा भेटी देऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक किंवा इतर समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि अगदी आनंदाने तुम्हाला तुमची सुट्टीही घालवता येईल. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील अश्याच काही ऑफबीट ठिकांणीबद्दल. 


हेदवी बीच
जर तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनारी भेट द्यायची असेल तर तुम्ही गर्दीपासून दूर असणाऱ्या हेदवी बीच ला भेट देऊ शकता. हेदवी बीच निसर्गसौदंर्य सोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाची ओळखला जातो. दापोली शहराजवळ असलेला हा अतिशय सुंदर असा समुद्र किनारा आहे. अतिशय शांत असलेल्या या समुद्रकिनारी तुम्ही येथील प्राचीन मंदिरांना देखील भेटी देऊ शकता. 

फ्लेमिंगो अभयारण्य
जर तुम्हाला निसर्ग आणि पक्ष्यांची आवड असले तर तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचा हा काळ एका सुंदर अश्या अभयारण्यात घालवू शकता. यासाठी तुम्ही फ्लेमिंगो अभयारण्यला भेट द्यायलाच हवी. मुंबई ठाणे सारख्या शहरात १७ चौ.किमी परिसरात पसरलेले हे फ्लेमिंगो अभयारण्य सुमारे २०० प्रजातींच्या पक्ष्यांचे माहेरघर असल्याचे सांगितले जाते. १५ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे खाडीला रामसार पाणथळ जागेचा दर्जा देण्यात आला. सिंधुदुर्गमधील 'मालवण सागरी अभयारण्या'नंतर महाराष्ट्रातील हे दुसरे सागरी अभयारण्य आहे. या ठिकाणी तुम्ही विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे निरीक्षण करू शकता. त्यासाठी येथे नौकाविहारची देखील सुविधा उपलब्ध आहे.

शेगाव
जर तुम्ही या सुट्ट्यांमध्ये शेगाव ला जाण्याचा विचार करत असला तर तुम्हाला टीमच्या प्लॅनमध्ये बदल करावा लागेल. सलग सुट्ट्या असल्याने शेगावमध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. शेगावला गजानन  महाराजांच्या  दर्शनासाठी तुम्हाला ४-५ तास रांगेत उभे राहावे लागेल. होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही  मंदिर परिसराच्या जवळ असलेल्या महाराजांच्या प्रकटस्थळ, बंकट सदन, कृष्णाजीचा मळा या ठिकाणा भेटी देऊन महाराजाचे दर्शन घेऊ शकता. या व्यतिरिक्त फिरण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण तुम्ही शोधात असला तर, शेगावपासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेल्या 'वारी हनुमान' या स्थळालाही तुम्ही भेट देऊ शकता. हे ठिकाण बऱ्याच लोकांना माहिती नसल्याने या ठिकणी फारशी गर्दी नसते.

सापुतारा
नाशिक आणि गुजरातच्या बॉर्डरवर असलेले सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे. नाशिकपासून सुमारे ९१ कि.मी. अंतरावर नाशिक-डांग-सुरत रस्त्यावर हे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून  १००० मीटर उंचीवर असलेले हे स्थान सातपुडा पर्वतराजीत वर एका पठार यासारख्या ठिकाणी वसलेले आहे. शहरापासून दूर असल्याने या ठिकणी तुम्हाला गर्दीचा त्रास होणार नाही. शिवाय या ठिकाणी तुम्ही बस, ट्रेन किंवा स्वःताच्या वाहनाने आरामात पोहोचू शकता.