जेएनएन, मुंबई. Valentine Week Special: प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही स्पेशल दिवसाची किंवा कुठल्याही क्षणाची वाट पाहावी लागत नाही. तसे आपल्या भारतीय संस्कृतीत यासाठी कुठला दिवसही राखीव नाही. परंतु, विदेशी पद्धतींमध्ये विविध दिवस साजरे केले जातात. प्रेम व्यक्त करण्यासाठीही दिवस साजरे केले जातात. आणि हीच पद्धती आपल्या भारतात देखील आत्मसात केली गेली. आणि आपल्याकडे देखील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी विविध दिवस साजरे केले जातात. प्रेम एक अशी भावना आहे जी सर्वोच्च समजली जाते. प्रेमावर आधारित चित्रपट सृष्टित अनेक चित्रपट तयार केले गेले आहेत. प्रेम कथा दर्शविणारे हे मराठी चित्रपट तुम्ही बघायलाच हवेत.

टाईमपास

रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. एक सुंदर प्रेमकथा या चित्रपटात दर्शविली आहे. टाईमपास या चित्रपटात दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर) यांची 90 च्या दशकातील प्रेमकथा दर्शविण्यात आली आहे. बालक-पालक, बालगंधर्व, नटरंग सारखे हिट चित्रपट देणारे रवी जाधव यांचा हा उत्तम चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडेपर्यंत हा चित्रपट मराठी सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. या चित्रपटाचा नंतर तेलुगुमध्ये 'आंध्र पोरी' या नावाने रिमेक करण्यात आला.  टाईमपास या चित्रपटाचा सिक्वेल  21 मे 2015 रोजी रिलीज झाला होता. टाईमपास 3 नावाच्या चित्रपटाचा तिसरा भाग 2022 मध्ये प्रदर्शित झाला.  या चित्रपटातील दगडू आणि प्राजु यांची प्रेमकथा चांगलीच गाजली होती.

'तू ही रे' 

संजय जाधव दिग्दर्शित 'तू ही रे'  हा मराठी चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'दुनियादारी' आणि 'प्यार वाली लव्ह स्टोरी' सारखे हिट चित्रपट देणारे संजय जाधव, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांचा हा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट 'सिल्लुनू ओरु कादल'चा अधिकृत रिमेक आहे. या  तमिळ चित्रपटात ज्योतिका, सुरिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांनी पहिल्यांदाच पार्श्वगायिका म्हणून गाणे रेकॉर्ड केले आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीची दुहेरी लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे.

मुंबई-पुणे-मुंबई 

सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे यांची लोकप्रिय जोडी झळकली होती. चित्रपटाची कथा पुण्याचा गौतम म्हणजेच (स्वप्नील जोशी) व मुंबईची गौरी (मुक्ता बर्वे) यांच्या भोवती फिरताना दिसते. या चित्रपटाचे पुढे दोन सिक्वेल आले. मुंबई पुणे मुंबई-२ हा चित्रपट 12 नोव्हेंबर 2015 रोजी प्रदर्शित झाला. व मुंबई पुणे मुंबई-३ हा चित्रपट 7 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. 


ती सध्या काय करते 

सतीश राजवाडे दिग्दर्शित हा मराठी चित्रपट 6 जानेवारी 2017 ला प्रदर्शित झाला. अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असून, आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे हे चित्रपटात तरुणपणीच्या भूमिकेत आहेत. 6 जानेवारी 2017 रोजी चित्रपट इंग्रजी भाषेतील उपशीर्षकांसह महाराष्ट्रात प्रदर्शित झाला त्यांनतर गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातही चित्रपट प्रदर्शित झाला.

सैराट 

    नागराज मंजुळे दिग्दर्शित 2016 चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे.  आटपात प्रॉडक्शन या बॅनरखाली नितिन केणी आणि निखिल साने यांच्यासह एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स आणि झी स्टुडिओज अंतर्गत निर्मिती केली आहे. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.  या चित्रपटात दोन जातींमधील तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कथा दर्शविण्यात आली आहे जे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये संघर्ष निर्माण होतो.