जेएनएन, मुंबई: मकर संक्रांति हा सण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात सण साजरे करण्याची पद्धत वेगळी असते. महाराष्ट्रातही मकर संक्रांति हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक सण साजरा करण्यामागे आपल्याकडे काही तरी पौराणिक कथा असतेच त्यावेळी एखादा सण साजरा करण्याची जी पद्धती होती तीच पद्धती आजतागत सुरु आहे. मकर संक्रांतीशी संबंधित देखील अश्याच काही पध्दती आणि परंपरा आहेत. अशी एक प्रथा म्हणजे मकर संक्रांतिच्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या आहारात तिळाचे गोड पदार्थ व खिचडी खाल्ली जाते. जाणून घेऊया काय आहे यामागची पौराणिक कथा आणि कशी सुरवात झाली मकरसंक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची.
मकर संक्रांति हा सण पौष महिन्यात म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये येते. थंडीच्या वातावरणात शरीराला उष्णता मिळावी यासाठी तीळ आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून त्यापासून लाडू अथवा इतर पदार्थ बनवले जातात. पण, खिचडी खाण्यामागे नेमकी कोणती प्रथा आहे. या दिवशी खिचडी खाण्याची सुरवात कशी झाली. हे अद्यापही लोकांना माहिती नाही.
मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्यामागची एक प्रथा अशी सांगितली जाते की, भारतावर जेव्हा परकीय आक्रमण करत होते तेव्हा ऋषी मुनींना पोट भरण्यासाठी बराच संघर्ष करावा लागत असे. खिलजीने देशावर आक्रमण केले असता ऋषी-मुनींना आपली जमीन, आपले मठ वाचवण्यासाठी मोठा सघर्ष करावा लागत होता. अनेकवेळा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत होती. एकदा बाबा गोरखनाथ यांनी पोट भरण्यासाठी डाळ, तांदूळ व सर्व भाज्या एकत्र करून एक पदार्थ बनवला ज्यामुळे सर्वांचे पोट भरले. हा पदार्थ बनवायला कमी वेळ लागला तसेच सर्वांनी आवडीने खाल्ला. अत्यंत कमी वेळेत हा पदार्थ तयार होत असल्याने ऋषी मुनींची भूक भागवण्याचा त्यांना मार्ग सापडला. बाबा गोरखनाथ यांनी या पदार्थाला खिचडी हे नाव दिलं. ज्या दिवशी हा पदार्थ पहिल्यांदा तयार करण्यात आला त्यादिवशी मकर संक्रांत होती. या दिवसाची आठवण म्हणून पुढे अनेक वर्षे ऋषी मुनी या दिवशी खिचडी बनवत राहिले. त्यांनतर मकर संक्रांतला खिचडी बनवण्याची परंपरा सुरु झाली. उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे मकर संक्रांतला विजय दर्शन पर्व म्हणूनही साजरे केले जाते.