जेएनएन, मुंबई. Maharashtra Day: देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर अनेक वर्षांनी देशातील राज्याच्या सीमा तेथील भाषेच्या आधारावर निश्चित केल्या गेल्या. महाराष्ट्र राज्याच्या सीमा निश्चित करतांना येथे भाषेचा प्रश्न निर्माण झाला. कारण या राज्यात  मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जात होत्या. अश्यातच राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई हे राज्य महाराष्ट्रात देण्यास नकार दिला. यामुळे मराठी नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात मुंबई समाविष्ट करण्यासाठी मोठा लढा लढला गेला. 

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती. या दिवशी हे निश्चित झाले होते की, महाराष्ट्र राज्यात कोणती शहरे स्थापित केली जाणार आहे. असे सांगितले जाते की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी देखील अनेकांनी प्रयत्न केले. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते आणि त्यामुळेच  मराठी माणसांच्या मनात प्रचंड रोष होता. 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  राज्य पुनर्रचना आयोगाचा निषेध नोंदविण्यासाठी छोट्या छोट्या सभा आणि आंदोलनांमधून नागरिकांना एकत्र केले जात होते. फ्लोरा फाउंटनकडे येत असलेल्या असंख्य नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. या आंदोलन कर्त्यांवर लाठीचार्जचा काहीही परिणाम होताना दिसला नाही. अशा वेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले ज्यामुळे वातावरण बिघडले. 

21 नोव्हेंबर 1956 रोजी झालेल्या गोळीबारात  अनेक आंदोलकांचा जीव गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 मध्ये आंदोलन झालेल्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

राज्य पुनर्रचना कायदा, 1956 नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या या कायद्याचा परिणाम म्हणून मुंबई राज्य निर्माण झाले. मात्र ते वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती; एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात. 25  एप्रिल 1960  रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, 1960 नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1 मे 1960 रोजी अंमलात आला. आणि याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.