जेएनएन, मुंबई. Lok Sabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणूका सुरु असून, महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूका पार पडत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या असून, आणखी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 177- वांद्रे पश्चिम मतदारसंघांतर्गत मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत आज सकाळी आर. व्ही. टेक्निकल स्कूल, रामकृष्ण मार्ग, खार जिमखाना येथून ‘व्होट टू व्होट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक शान म्हणाले की, आपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 20 मे 2024 रोजी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असल्यास ते एक दिवस पुढे ढकलावे. मी सुद्धा मतदानाच्या दिवशी मुंबईतच राहणार असल्याचे गायक शान यांनी सांगितले.
रॅलीत गायक शान यांच्यासह सहभागी नागरिकांनी ‘आपलं मत आपला अधिकार’, ‘बुढे हो या जवान- सभी करे मतदान’, ‘माय व्होट- माय फ्यूचर’, ‘आपका व्होट आपकी ताकत आपका मत आपका अधिकार’ आदी घोषणाही दिल्या. या रॅलीत नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात या पाच टप्प्यात होणार आहेत निवडणूका
पहिल्या टप्पा 19 एप्रिल गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक 5 मतदार संघ
दुसऱ्या टप्पा 26 एप्रिल 2024 बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदार संघ
तिसरा टप्पा 7 मे 2024 रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले 19 मतदार संघ
चौथा टप्पा 13 मे 2024 अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर या 19 मतदारसंघात निवडणूक होणार आहेत.
पाचवा टप्पा 20 मे 2024 धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई या 6 मतदार संघ